Home / Uncategorized / ‘आपले हंबर्डी गाव‘ पुस्तकातून ग्रामीण संस्कृती, संस्कार जीवंत!

‘आपले हंबर्डी गाव‘ पुस्तकातून ग्रामीण संस्कृती, संस्कार जीवंत!

* माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन

* लेखक, पत्रकार खेमचंद पाटील यांच्या ‘आपले हंबर्डी गाव‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

हंबर्डी / जळगाव । ग्रामीण भागातील संस्कृती म्हणजेच एक मोठा संस्कार आहे. लहान गावात चांगली माणसे जन्माला येतात. व पुढे कर्तृत्त्ववान बनतात. त्याचप्रमाणे हंबर्डी गावातील युवा लेखक खेमचंद पाटील तयार झाला. ‘आपले हंबर्डी गाव‘ या पुस्तकात बारीक-सारिक माहिती देण्यात आली आहे. खेमचंदने लहान वयात अनेक ठिकाणी लिहिण्याचे काम केले. स्वत: माहिती घेऊन हे पुस्तक लिहिले. प्रत्यक्ष गाव कसे आहे, याचे वर्णन यामध्ये केले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. भाषा अत्यंत मजबूत करण्याच्या दृष्टीने वाचन करणे, महत्वाचे आहे. या हंबर्डी गावात खेमचंद पाटीलमुळे चांगले नेतृत्व उदयास येत आहे. चांगले काम करणार्‍यांना संधी दिली पाहिजे, असे आवाहन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ‘आपले हंबर्डी गाव‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 13 फेब्रुवारी 2019 रोजी हंबर्डी येथील जागृती विद्यालयात सकाळी 11.30 वाजता एकनाथराव खडसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरिभाऊ जावळे उपस्थित होते. सामाजिक व वृत्तपत्र लेखन क्षेत्रातील निष्ठावंत, प्रामाणिक योगदानाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयातर्फे खेमचंद पाटील यांना एकनाथराव खडसे यांच्या हस्ते उत्कृष्ट गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रकाशन सोहळ्यास मसाकाचे चेअरमन शरद महाजन, अनिल लढे न्हावी, निवृत्ती पाटील, साहित्यिक व. पु. होले, सुनील नेवे, वासंतीताई चौधरी, योगिता नेमाडे, पत्रकार तुषार वाघुळदे, भरत महाजन, माजी नगराध्यक्ष आशालता चौधरी, नगरसेवक हेमराज चौधरी, नितिन राणे, रविंद्र होले, सविता भालेराव, सरपंच महेंद्र पाटील, उपसरपंच इंदुबाई पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, हर्षल पाटील, जितेंद्र चौधरी, माजी सरपंच लहान वाघोदा, एल. झेड. पाटील, शंतनू गचके, हेमंत नेहेते या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लेखक खेमचंद पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी ज्या गावात जन्माला आलो, त्या गावचे काहीतरी देणे लागतो, या श्रद्धेमुळेच माझ्या जन्मभूमीप्रती ऋण फेडण्याचा हे पुस्तक लिहून मी अल्पसा प्रयत्न केला आहे. मी गावाचा इतिहास लोकांसमोर आणला आहे. या पाठीमागचे उद्देश एकच आपण ज्या गावातील आहोत, त्या गावाचा इतिहास आपल्याला माहीत असावा. हे पुस्तक लिहिण्यासाठी मला अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभले, मी त्यांचा आभारी आहे.

नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार हरिभाऊ जावळे म्हणाले, गावाकडची राहणी या जनस्वभाव गुणदोष धार्मिकता रितीरिवाज त्यांची माहिती या पुस्तकात आहे गावाची माहिती पूर्णपणे आकलन केली सर्व पुस्तकातील माहिती उपयुक्त आहे. त्याशिवाय गावच्या समाजाची माहिती सुद्धा घेतलेली आहे.

त्यानंतर साहित्यिक व. पु. होले भाषणात म्हणाले, एखादे पुस्तक निर्माण करणे हे अत्यंत जिकीरिचे काम असून, त्यात प्रतिभा दिसायला हवी असते. साहित्यिकांची ताकद फार मोठी असते, त्यातून समाजहित साधले गेले पाहिजे. साहित्यातून अनेकांच्या समस्या प्रश्‍न सहज सोडवले जाऊ शकतात. त्यासाठी वाचन हवे, हे वाचन उत्तम उत्तम लेखकांच्या पुस्तकाचे हवे.

आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व लेखक हेमंत नेहेते आपल्या मनोगतात म्हणाले, माणूस किती जगला, कसा जगला, त्याने किती हौस-मौज केली या प्रश्‍नांपेक्षा तो इतरांपेक्षा वेगळे कसा जगला, याला सर्वोच्च स्थान आहे. मळलेल्या पायवाटांवरुन लोक लीलया प्रवास करतात, त्यात पुरुषार्थ नव्हे; तर अगस्ती होऊन नव्या वाटेचा कणखरपणे शोध घेऊन आपल्या कर्तृत्वाने तेजस्वी पाऊलखुणा उमटविणे हे महत्त्वाचे. माता आणि माती यामध्ये केवळ एका वेलांटीचा फरक आहे, एक जन्मदाती तर दुसरी कर्मदाती आहे, आपल्या माती अर्थात जन्मभूमीचे ऋण लक्षात ठेऊन खेमचंद गणेश पाटील या पत्रकाराने आपल्या गावाचा इतिहास शब्दबद्ध केला आहे.
हेमंत नेहते यांनी पुस्तकाचे व लेखकाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमास सहकार्य ग्रामपंचायत कार्यालय व जागृती विद्यालय, सार्वजनिक गणेश मंडळाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. डी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी तर आभार खेमचंद पाटील यांनी मानले.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …