Home / Uncategorized / लेवा पाटीदार-पाटील बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने हळदीकुंकू समारंभ उत्साहात

लेवा पाटीदार-पाटील बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने हळदीकुंकू समारंभ उत्साहात

जालना । येथील लेवा पाटीदार-पाटील बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने समाजातील तसेच परिसरातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ रविवार, दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील कवयित्री माधुरी महेंद्र चौधरी, जालना मंडळाच्या उपाध्यक्षा काजल संजय ढाके, कार्यकारिणी सदस्या प्रतिभा विजय पाटील आदी मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लेवा पाटीदार पाटील बहुउद्देशीय मंडळाच्या कार्यकारिणी सदस्या प्रतिभा विजय पाटील यांनी अतिथींचा परिचय करुन दिला. तसेच मंडळाच्या उपाध्यक्षा काजल ढाके यांनी अतिथी माधुरी चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर सरस्वती, बहिणाबाई चौधरी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माधुरी महेंद्र चौधरी यांच्या हस्ते माल्यार्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना माधुरी चौधरींनी मकर संक्रांतीचे महत्व सांगितले. प्रत्येक महिला घर, संसाराचा कणा असते. त्यामुळे तिच्याच हातात घराचा आनंद असतो. प्रत्येक महिलेने आपले घर परिवार आनंदी कसे ठेवावे, महिलांनी स्वत: कसे आनंदी रहावे, यावर अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी स्त्री-पुरुष दोघांनी एकमेकांचा आदर करत एकमेंकाला साथ दिली पाहिजे, असे आवाहन महिलांना केले. तसेच आपल्या भाषणात मनोरंजनात्मक किस्से कथन करून छोट्या-छोट्या गोष्टी सांगत उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी कार्यक्रमादरम्यान, उपस्थित महिलांनी संगीतखुर्ची खेळाचा आनंद लुटला. यामध्ये विजेत्या ठरलेल्या धैर्यशीला चौधरी यांना अतिथींच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महिलांना मंडळातर्फे हळदी कुंकू आणि वान देण्यात आले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालना मंडळाच्या पुरुष सदस्यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता चौधरी यांनी केले.

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …