Home / Uncategorized / घराच्या गच्चीवर फुलविली सेंद्रिय बाग!

घराच्या गच्चीवर फुलविली सेंद्रिय बाग!

भुसावळच्या प्रदीप फिरके यांची ‘टेरेस गार्डन’ बनतेय कुतूहल!

भुसावळ । येथील नंदनवन कॉलनीतील प्रदीप फिरके व त्यांची पत्नी मनीषा फिरके यांनी घराच्या गच्चीवर कमीत कमी माती, सेंद्रिय खतांचा नियोजनपूर्वक वापर करुन ‘ग्रो बाग’ फुलविली आहे. त्यांच्या बागेमध्ये हादगा, रायआवळा, रायकेळी, नागवेलीची पाने असे एकाहून एक सरस रोपे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे मातीचा कमीत कमी वापर व परिसरातील पालापाचोळा जमवून तयार केलेल्या सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर त्यांनी आपल्या बागेत केलेला आहे. या ‘टेरेस गार्डन’ परिसरातील नागरिकांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहे.

साधारणपणे फिरके दांपत्य गेल्या 10 वर्षापासून हा छंद जोपासत आहे. खरे तर त्यांची मुलगी पूर्वा फिरकेला या गोष्टीची आवड होती. तिने गच्चीवर पालापाचोळा एकत्र करुन सुरुवातीला गुलाबाचे झाड कसे वाढेल, यासाठी प्रयत्न केले. हळूहळू घरातील सर्वांना या छंदाची गोडी लागली. पूर्वा पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेल्यानंतर ही सर्व जबाबदारी तिच्या आईवडिलांनी स्वतः घेतली. विविध व्हाट्सअप ग्रुप, युट्यूब यातून माहिती मिळवत त्यांनी गच्चीवर आपला बगीचा साकारला. घराच्या समोरच असलेल्या दोन-तीन कडुनिंबाच्या मोठ्या झाडांच्या खाली पडलेला पालापाचोळा ते पोत्यांमध्ये जमा करुन ठेवत. त्याचप्रमाणे विविध भाज्यांचा कचराही ते जमा करतात. हा सर्व कचरा कुजवून त्याचा खतासाठी वापर केला जातो. या बागेत नेहमीच्या भाज्या तर आहेतच, याशिवाय बटाटे, हादगा, रायआवळा, रायकेळी, अस्मंतारा अशी वेगळी रोपे देखील पाहायला मिळतात. दोन वर्षात केवळ सहा फूट वाढलेल्या हादग्याच्या झाडाला फुलेदेखील लागली आहेत. गच्चीवर येणार्‍या पक्षांनादेखील अन्न मिळावे, म्हणून त्यांनी चक्क ज्वारी आणि बाजरी यांचीदेखील पेरणी केली आहे. बाग विकसित करण्यासाठी सुभाष पाळेकर यांच्या युट्यूबवरील व्हिडीओची त्यांना चांगलीच मदत झाली, असेही प्रदीप फिरकेंनी ‘लेवाशक्ति’ला सांगितले. पाण्यामध्ये हिंग, तुरटी व विम लिक्वीड हे एकत्र करुन त्याची फवारणी विविध रोग पडल्यास केली जाते. तसेच गोमूत्राची फवारणी देखील केली जात असून, यामुळे पिकांना वाढीसाठी आवश्यक घटक उपलब्ध होत असल्याचे प्रदीप फिरके यांनी सांगितले.

पालापाचोळा जमा करुन खत तयार करतो, शिवाय केळीची साल, अंड्यांचे टरफल यांचाही वापर करतो. जंगलातल्या गोवर्‍या बारीक करुन टाकतो. त्यामुळे मुळांचे कमी जागेत चांगले पोषण होते व लवकर फळधारणा होते, असे निशा फिरके यांनी सांगितले.

या बागेत सात ते आठ प्रकारच्या मिरच्या लावलेल्या आहेत. यामध्ये उलटी मिरची, लवंगी मिरची, रसगुल्ला मिरची, जाड मिरची, ढोबळी मिरची, भोंगी मिरची, खुरासणी मिरची, असे विविध प्रकार दिसून येतात. याच बागेत देशी बियाण्यांची निर्मिती करुन त्यांचीच लागवड केली जाते. नारळाच्या शेंडीत चिमूटभर माती टाकून त्यात बी लावून रोप तयार करतात. घराच्या परिसरातच बेल, अडुळसा, नागवेल, लिंबू आदी झाडेदेखील त्यांनी लावली आहेत. या सर्व झाडांच्या देखभालीसाठी त्यांचे वडील देविदास फिरके हे देखील त्यांना मदत करत असतात.

( संकलनः ललित फिरके
मोबाः 9421523840 )

Check Also

मयुरी बोंडेची गणित व शास्त्र विषयात सुवर्णपदक कामगिरी

योगेश पंढरीनाथ बोंडे व शितल योगेश बोंडे यांची कन्या मयूरी ही कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूलमधील इ.2री …