Home / आमच्या विषयी

आमच्या विषयी

लेवा पाटीदार समाजबांधवांच्या सेवेत ‘मासिक लेवाशक्ती’ रूजू झालेले आहे. लेवा पाटीदार समाज हा अत्यंत मेहनती, कष्टाळू, प्रगतीशील, लवचिक आणि अर्थातच शिक्षणाची कास धरणारा आहे. आपल्या बांधवांनी जगात विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कार्य केले आहे तर अनेक जण आजही शिखर गाठण्याच्या प्रयत्नांत आहेत. अर्थात दुसरीकडे समाजातील एक घटक हा आजही प्रगतीच्या संधींपासून वंचित आहे. या सामाजिक स्थितीला अगदी समतोलपणे समाजासमोर मांडण्यासाठी ‘लेवाशक्ती’ आपल्यासमोर येणार आहे. परंपरेला जपत असतांना नाविन्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. याचप्रमाणे जुन्या आणि नव्या युगातील अनिष्ट प्रथांवर कडाडून टिका करण्यासाही आम्ही कधी मागेपुढे पाहणार नाहीत याची खात्री बाळगा. मुळातच लेवा पाटीदार समाजाला एका समतोल आणि भेदाभेद विरहित मुखपत्राची असणारी गरज ‘लेवाशक्ती’ भरून काढेल असा आम्हाला विश्‍वास वाटतो.

सर्वसाधारणपणे ‘लेवाशक्ती’मध्ये विविध गाव आणि शहरांमधील समाजमंडळे, भ्रातृमंडळे, महिला मंच/मंडळे, विविध संघटना आदींच्या कामांची माहिती देण्यात येईल. याचसोबत वैयक्तीक पातळीवरील यश-निवड-नियुक्ती-सन्मान आदींनाही समाजासमोर आणले जाईल. मात्र ‘लेवाशक्ती’चा हेतून अजूनही व्यापक असल्याने विविध स्तंभांच्या (कॉलम) माध्यमातून समाजातील तरूण, प्रौढ, ज्येष्ठ, महिला, तरूणी, विद्यार्थी आदी विविध घटकांना भावणारे, त्यांच्या समस्या मांडणारे तसेच मार्ग सुचविणारे साहित्य आपल्यासमोर येईल. यातील सर्व स्तंभ हे समाजातील विविध मान्यवरांसह ते अगदी सर्वसाधारण लोकांच्या अभिव्यक्तीवर आधारित राहणार आहेत. अर्थात यातून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याच प्रकारे आध्यात्म, आरोग्य, शिक्षण, व्यापार, उद्योग, समाजसेवा आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कर्तबगारीची माहितीदेखील आपल्यासमोर येणार आहे.

लेवा पाटीदार समाजात भेदाभेदविरहीत नव्या मंचाची सुरूवात ‘लेवाशक्ती’च्या माध्यमातून होणार आहे. यात कोणत्याही स्वरूपाचा भौगोलिक भेद नसेल. अर्थात खान्देशी, वर्‍हाडी, मुंबई-पुण्यातील वा विदेशातील असा कोणताही भेद मानण्यात येणार नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे समाजाच्या चार महत्वाच्या शाखा असणार्‍या सावदेकर, कंडारकर, गाडेगावकर आणि थोरगव्हाणकर या शाखांमधील सर्व समाजबांधवांना समान न्याय देण्याच्या हेतूने ‘लेवाशक्ती’ उदयास येत आहे. समाजातील भेदाभेद मिटवून एकत्रीकरणाच्या दिशेने यातून महत्वाचे पाऊल पडेल असा आम्हाला विश्‍वास वाटतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकारणविरहीत मासिक म्हणून आम्ही आपल्यासमोर येणार आहोत. आमच्या या प्रयत्नाला आपल्याकडून सहकार्यरूपी आशीर्वाद अपेक्षित आहेत. धन्यवाद.